नवीन द्राक्ष लागवड पूर्वतयारी

  द्राक्ष लागवडीचा बारकाईने अभ्यास करून, द्राक्षवेलीची योग्य काळजी घेवून द्राक्ष लागवड एक प्रगत उद्योग म्हणून केला तर नवनिर्मितीचा आनंद प्राप्त करुन देऊन, इतर पिकापेक्षा अधिक नफा मिळवून देणारे असे हे पीक आहे.
जमीन 
  द्राक्षबागेला हलकी, मुरुमाची व उत्तम निचरा असणारी जमीन चांगली समजली जाते. मात्र काळ्या खोल जमिनीत कुजलेले शेणखत व मुरूम टाकुण योग्य निचरा निर्माण करून द्राक्षाचे चांगले पीक घेता येते. तसेच १०% पेक्षा जास्त चुनखडी असणा-या जमिनीत फॉस्फेट क्रियांशील होत नसल्यामुळे फॉस्फेटचे खडे तयार होतात. म्हणजेच फॉस्फेट वेलीला उपलब्ध होत नसल्यामुळे ब्लॉक होते. अशा जमिनीत द्राक्षासाठी च-या पाडून त्यात दुसरीकडून कसदार माती व चांगले कुजलेले शेणखत आणून च-या भरल्या तर अशा जमिनीतही द्राक्षबाग यशस्वी होऊ शकते. द्राक्ष लागवडीस ६.५ ते ८.५ पी.एच. सामू असलेली जमीन हवी. तसेच क्षारता १.० मिलीमोज व क्लोराईडचे प्रमाण ३५० पी.पी. एम. व सोडीयमचे प्रमाण ७०० पी.पी एम. पर्यंत चालू शकते. म्हणून नवीन द्राक्षबाग लागवड करू इच्छिणार्‍या अभ्यासू शेतक-यांना माझी एक विंनती आहे कि, त्यांनी महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाच्या पुणे, नाशिक, सांगली, सोलापूरच्या विभागीय कार्यालयात मातीचे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत. म्हणजे त्यांना त्या तपासणी संबंधीचा सविस्तर अहवाल घरपोच पोस्टाने पोहोच केला जातो. नवीन द्राक्षबागेची लागवड करावयाच्या जमिनीत ठराविक ठिकाणी योग्य कसाची माती बनवून उत्तम निचरा असणा-या कोणत्याही जमिनीत द्राक्षबागेचे उत्तमरीत्या पीक येऊ शकते. 
हवामान    
  द्राक्ष वेलीच्या जोमदार वाढीला मध्यम उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. तसेच २५ ते ३६ डिग्री. से. तपमान सर्वात उत्तम असते. म्हणून महाराष्ट्रातील कोकण सोडून इतर बहुतेक जिल्ह्यांची भौगोलीक परिस्थीती द्राक्ष उत्पादनास अनुकूल अशीच आहे.
  महाराष्ट्रातील नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे या भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षाची लागवड आहे. उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर या जिल्ह्यानंतर धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, जळगाव, परभणी, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, अकोला या जिल्ह्यातूनही द्राक्ष लागवडीचे क्षेत्र वाढू लागले आहे.
भांडवली खर्च
  नवीन द्राक्षबाग उभी करत असताना योग्य अंतरावर ठराविक खोलीच्या ठराविक रुंदीच्या च-या खोदणे, चांगले कुजलेले शेणखत व रासायनिक खते, मांडव उभारणी, पाणी पुरवठयासाठी ठिबक सिंचन पध्दत, बुरशीनाशके, कीटकनाशके, संजीवके व मजुरी इत्यादी बाबीवरील खर्चासाठी भांडवलाची आवश्यकता असते.
पाणी
  द्राक्षवेलही इतर पिकांच्या तुलनेने फारच संवेदनाक्षम आहे. तिला क्षारयुक्त, रवाळ, मचूळ पाणी चालत नाही. चांगल्या गुणवत्तेचे पाणी आवश्यक आहे. पाण्याची चांगली गुणवत्ता ही त्यात उपलब्ध असलेले क्लोराईड, सोडीयम तसेच पाण्यात विरघळलेले क्षार यावर अवलंबून असते. पाण्यात ५० पी.पी.एम. पेक्षा कमी क्षार तसेच   १२० पी.पी.एम. पेक्षा कमी क्लोराईड व ३४० पी.पी.एम. कमी सोडीयम असेल, असेच स्वच्छ, हलके, मृदू व गोड पाणी द्राक्षपिकाला चांगले मानवते.
द्राक्षांच्या विविध जाती
  महाराष्ट्रात पूर्वी चिमासाहेबी (सिलेक्शन७), भोकरी, अनाबेशाही, रावसाहेबी, काळीसाहेबी, अर्काश्याम, अर्काकांचन,बंगलोर ब्ल्यू, बंगलोर पर्पल इत्त्यादी बियांच्या द्राक्ष पिकांची लागवड करत असत. मात्र गेल्या ४५ वर्षापासून बिनबियांच्या सीडलेस द्राक्षवाणाची लागवड केली जाते. त्यामध्ये थॉमसन, तास-ए-गणेश, सोनाका, माणिक चमन, मोनिका, शरद सीडलेस, किसमिस चोर्नी, कृष्णा सीडलेस,सरिता सीडलेस, क्लोन टू ए,रेड ग्लोब इत्यादी वाणांची लागवड आहे. अलीकडच्या काळात चुनखडीच्या जमिनीचे प्रश्न भेडसावू लागल्यामुळे रुट्स्टॉकचा वापर आवश्यक बनला त्यामध्ये बेंगलोर डाग्रीज, अमेरिकन  डाग्रीज, रामसे, १६१३, १६१६, सॉल्टिक्रिक इत्यादी जंगली जाती आहेत.शास्रज्ञांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्रात बंगलोर डाग्रीज ह्या रुट्स्टॉकचे रिझल्ट इतर डाग्रीज जातीपेक्षा खुपच चांगले असल्यामुळे त्यांनी बंगलोर डाग्रीजची रुट्स्टॉक म्हणून शिफारस केलेली आहे.
लागवडीचे अंतर
  द्राक्ष लागवड करीत असताना दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर नेमके किती असावे याबाबत तज्ञांमध्ये अनेक मते आहेत. द्राक्षवेल ही किती जोमाने वाढणार आहे, वेलाचा विस्तार किती करावयाचा आहे? ओनरूट (स्वमुळ) की डाग्रीजची लागवड करायची आहे. तसेच जमिनीची व पाण्याची प्रत कशी आहे? तसेच हवामान, पाऊस व उष्णतामान कोणत्या प्रकारचे आहे. जमिनीची मशागत कशी व कोणत्या औताने करणार आहेत? चर जे.सी.पी. ने कि टॅक्टरने काढावयाची आहे? द्राक्षवेलीपासून कोणत्या गुणवत्तेचे, क्वालिटीचे किती उत्त्पन्न व किती वर्षे अपेक्षित आहे? या सर्व गोष्टींचा विचार करून लागवडीचे अंतर ६ बाय ४ फुट, ८ बाय ४फुट , ८ बाय ५ फुट, १० बाय ६ फुट, १२ बाय ६ फुट, ९ बाय ५ (नवीन) फुट ठरवावे लागेल.
द्राक्ष बागेची लागवण      
  पूर्वतयारी- ज्या निवडलेल्या जमिनीत द्राक्षबाग लावावयाची आहे. ती जमीन पलटी नांगराने खोल नांगरावी. खुरटणी करावी, काडीकचरा, पालापाचोळा, धसे वेचावित. कुळवन करावी. शेत भुसभुशीत करावे. द्राक्षबाग किती अंतरावर लावायची त्या अंतराने आरवणी(आखणी) शक्यतो दक्षिणोत्तर करावी.टॅक्टरच्या सहाय्याने किंवा जे.सी.पी. च्या सहाय्याने २.५ फुट रुंद व २ फुट खोल च-या  पाडाव्यात. माती व पाण्याच्या तपासणीच्या अहवालानुसार एकरी कुजलेले शेणखत ४० बैलगाड्या म्हणजेच १० ट्रॉल्या फॉंलीडोल पावडर एकरी २५ कि.ग्रॅ. सुपर फॉंस्फेट १/२ टन,मॅग्नेशिअम सल्फेट २५ कि.ग्रॅ. टाकून त्यावर माती ओढावी.चर जमिनीपासुन ४' इंच खोल ठेवावी.पाटाने पाणी द्यावे.वापसा येताच ठराविक अंतरावर ६' व्यासाचे व ६' खोलीचे खड्डे काढावेत.स्वमुळावरील नर्सरी १५ ऑगस्ट किंवा १५ जानेवारीला लावावी.त्याचप्रमाणे रुट्स्टॉकची लागवण १५ जानेवारी नंतर ३० एप्रिल पर्यतच करावी.रुट्स्टॉकच्या मुळ्या काढून सप्टेंबर महिन्यात योग्य डोळा भरण्यासाठी योग्य रीतीने काडी तयार करावी.  

1 आपली प्रतिक्रिया » :

Abhi Doshi म्हणाले...

can you please tell me whether grapes can be planted in region of dist mulshi of heavy rainfall soil of murrum mix with good drainage capacity

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.